कर्नाळा किल्ला हा महाराष्ट्रातील एक अतिशय प्राचीन किल्ला आहे. किल्लाच्या अंगठा सारख्या आकारामुळे किल्ला वेगळा वाटतो.किल्ल्याचा माथा फारच लहान आहे.पक्षी अभयारण्यामुळे हा किल्ला प्रसिद्ध आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी चहूबाजूंना दाट जंगल आहे
भौगोलिक स्थान
मुंबईपासून ६२ किलोमीटरवर व पनवेलपासून १३ किलोमीटरवर स्थित आहे.
इतिहास
कर्नाळा हा किल्ला प्राचीन कालखंडापासून प्रसिध्द आहे. प्राचीन पनवेल व बोर घाटातून मुंबई, चौल बंदराकडे होणार्या व्यापारी वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याच्या कामी किल्ल्याचा उपयोग केला जात असे.
किल्ल्याचा उल्लेख यादवकाळात आढळतो. किल्ल्यावर देवगीरी यादवांचे १२४८ ते १३१८ पर्यंत राज्य होते. पुढे १३१८ ते १३४७ पर्यंत दौलताबादच्या मुस्लिम शासकांचे राज्य होते. त्या काळात कर्नाळा उत्तर कोकणातील ठाणे व रायगड जिल्हयाचे मुख्यालय होते. नंतर किल्ला गुजराती फौजेच्या ताब्यात होता. सन १५४० मध्ये अहमदनगर सैन्याच्या एका तुकडीने हा किल्ला जिंकला. पुढे गुजराती शासकांनी पोर्तु.गीजांच्या मदतीने पुन्हा जिंकला. अहमदनगर फौजेने किल्ल्यास वेढा घातला असता गुजराती सेनेने तो पोर्तुगीजांच्या स्वाधीन केला. वसईच्या कप्तानाने किल्ल्यावर चाल करून अहमदनगर सैन्याचा वेढा परतवुन लावला. किल्ला संरक्षणार्थ पोर्तुगीजांनी ३०० यूरोपीयन सैन्य ठेवले. पोर्तुगीज व अहमदनगरच्या मैत्रीच्या तहात ठराविक खंडणी (१७५० पौँड/वर्ष) च्या मोबदल्यात अहमदनगरच्या निजामाकडे सोपवण्यात आला. सन १६५७ मध्ये छत्रपती शिवरायांनी कर्नाळा मुघलांकडुन जिंकुन घेतला. मिर्झाराजे जयसिंग बरोबर पुरंदरच्या तहात हा गड मुघलांच्या ताब्यात गेला परंतु १६७० मध्ये तो महाराजांनी परत मिळवला. छत्रपती शिवरायांच्या मृत्युनंतर औरंगजेबाने हा किल्ला जिंकुन घेतला. सन १७४० मध्ये या भागावर पेशव्यांचा अंमल आल्यावर तो पेशव्यांच्या ताब्यात आला. मे १८०३ इंग्रजांनी दुसर्या बाजीरावच्या बाजुने गडाचा ताबा घेतला. सन १८१८ नंतर इंग्रजांकडे तो कायम आला. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचे आजोबा सन १८१८ पर्यंत कर्नाळ्यांचे किल्लेदार होते.
पाहण्यासारखी ठिकाणे
किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले कर्नाळा पक्षी अभयारण्य हा परिसर पक्ष्यांच्या वैविध्यतेसाठी प्रसिद्ध आहे. दाट जंगलातील सावली व पक्ष्यांचा मधूर स्वरांचा मागोवा घेत डोंगराच्या धारेवरुन चढताना आपण तटबंदीपाशी येतो.
कर्नाळा किल्ला समुद्रसपाटीपासुन ४४५ मीटर उंचीवर आहे. किल्ल्याची तटबंदी ढासळलेल्या अवस्थेत आहे. किल्ल्यावर कर्नाई मातेचे मंदिर आहे. मंदिराच्या जवळच ढासळलेल्या अवस्थेतील एक वाडा आहे. गडावरील अंगठ्याच्या आकारातील सुळक्याच्या पायथ्याशी पाण्याची टाकी आणि धान्य कोठारे आहेत सुळक्यावर मधमाशांचे पोळे दृष्टीस पडते. सुळका चढण्यासाठी अवघड असल्यामुळे प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असल्याशिवाय चढण्याचा प्रयत्न करू नये.
जेवण-राहण्याची सोय
किल्ल्यावर राहण्याची सोय नाही. किल्ल्याच्या पायथ्याशी शासकीय विश्रामधामात राहण्याची सोय होऊ शकते. जेवणाच्या सोयीसाठी किल्ल्याखाली हॉटेल्स आहेत
फोटो






किल्यावरुन दिसणारी काही दृश्ये




















एकदा तरी जावून यावेच.
१२०० वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीत या किल्ल्याने अनेक स्थित्यंतरे पाहिलीत. भोज, शिलाहार, देवगिरीच्या यादव घराण्यांचा सुवर्णकाळ जसा पाहिला तसा यवनी परचक्रांच्या टाचाखाली घोर अंधकारात सुमारे ३०० वर्षे पिचत गेलेला महाराष्ट्रही याने पाहिला. छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेचा सोहळा पाहत असताना १५० वर्षात मरहट्टे भीमतडीच्या तट्टाणीला यमुनेचे पाणी पाजुन अटकेपार दौडत जातानाही पाहिले. इंग्रजांचा भारतावर युनियन जॅक फडकला हे पारतंत्र्यही त्याने पचवले आणि आज स्वतंत्र भारतातील महाराष्ट्रही तो पाहतो आहे.
